मालवण, दि. प्रतिनिधी : “जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार हे अभ्यासाशिवाय केवळ हवेत विरणाऱ्या घोषणा करत आहेत. चिपी विमानसेवेपासून ते बोटसेवेपर्यंत आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर सत्ताधारी अपयशी ठरले आहेत,” असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांनी केला.
कचेरी रोड येथील मनसेच्या नवीन तालुका कार्यालयाचे उद्घाटन शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
१५ ऑगस्टपासून नवी मुंबई ते चिपी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, ही घोषणाही नेहमीप्रमाणे हवेतच विरल्याचा आरोप सावंत यांनी केला. तसेच मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली भाऊचा धक्का ते विजयदुर्ग बोटसेवाही काही महिन्यांतच बंद पडली, असा टोला त्यांनी लगावला.
महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून निशाणा
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप १५ ते २० टक्के अपूर्ण असल्याचा दावा करत सावंत यांनी या रखडलेल्या कामाला सत्ताधारी राजकारणीच जबाबदार असल्याचा आरोप केला. यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांना महामार्गाच्या दुरवस्थेमुळे मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.
ओसरगाव येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यावरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शासकीय तसेच दैनंदिन कामासाठी ओरोस येथे ये-जा करणाऱ्या जिल्हावासीयांवर या टोलनाक्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड पडणार असल्याचे सांगत टोलनाका खारेपाटण हद्दीत असायला हवा होता, अशी मागणी त्यांनी केली.
एलईडी मासेमारी, हत्तींचा उपद्रव आणि रोजगाराचा प्रश्न
जिल्ह्यातील एलईडी मासेमारी, गवारडे येथील हत्तींचा उपद्रव, रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या तसेच ‘जेन झी’ युवा पिढीसाठी रोजगाराचा अभाव यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोपही सावंत यांनी केला.
जिल्ह्यातील या सर्व प्रलंबित प्रश्नांवर मनसे आगामी काळात आक्रमकपणे आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
नवीन तालुका कार्यालयाचे उद्घाटन
कचेरी रोड येथील मनसेच्या नवीन तालुका कार्यालयाचे उद्घाटन शिरीष सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, शहराध्यक्ष सागर जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन बोडवे, विल्सन गिरकर, जेनिफर अन्ननसिएशन, सूरज पुजारे, संतोष सावंत, प्रसाद परब, प्रितेश सावंत, नारायण शिरोडकर, प्रसाद मेस्त्री, महेश गावडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






