आराध्य व लेईशाने मिळविले प्रत्येकी २४२ गुण; जिल्हा गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी
मालवण, दि. १६ : शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीने प्रत्येकी २४२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोळंब-कातवड शाळेचे मुख्याध्यापक नारायण केशव पराडकर आणि मालवण पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक वर्षा नारायण पराडकर यांचा मुलगा आराध्य याने इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
त्याचप्रमाणे त्याची बहीण लेईशा हिने इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी सर्वसाधारण गटाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. दोन्ही भावंडांनी प्रत्येकी २४२ गुण मिळवत कुटुंबाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा खोवला आहे.
कुमार आराध्य पराडकर हा जिल्हा परिषद शाळा रेवतळेचा विद्यार्थी असून, लेईशा ही अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवणची विद्यार्थिनी आहे.
आराध्यला जिल्हा परिषद शाळा रेवतळेचे मुख्याध्यापक देविदास प्रभूगावकर आणि उपशिक्षक महादेव घोडके यांचे मार्गदर्शन लाभले. तर लेईशाला टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन मिळाले.
एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश मिळवल्याने पराडकर कुटुंबाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर यांनी शाळेत जाऊन आराध्य आणि लेईशाचे अभिनंदन केले. तसेच गटविकास अधिकारी परागिणी पाटील, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, सदस्य दीपक चव्हाण, माजी गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर, गडचिरोली गटविकास अधिकारी आत्मज मोरे, माजी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी आणि कोळंब केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांच्यासह शिक्षक व मित्रपरिवाराने दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






