मालवण, दि. प्रतिनिधी : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त तोंडवळी-वरची येथील श्री देव वाघेश्वर भक्त मंडळाच्या वतीने ‘देखावायुक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता श्री देव वाघेश्वर मंदिर परिसरात ही स्पर्धा रंगणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघाला १० हजार रुपये रोख पारितोषिक, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला ७ हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर संघांनाही मानधन देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता श्री देव वाघेश्वराला बेलपत्र अर्पण करून पूजा-अर्चनेने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी दिंडी नृत्य भजन स्पर्धेला प्रारंभ होईल. कार्यक्रमानंतर रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा, श्री देवी भराडी प्रसादिक भजन मंडळ, मसदे (ता. मालवण) तसेच श्री माऊली वारकरी दिंडी, मोर्वे (ता. देवगड) हे तीन संघ सहभागी होणार आहेत.
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडी नृत्य भजन स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री देव वाघेश्वर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.






