आश्वासनानंतर सुमारे पाच तासांनी कामगार कामावर हजर
मालवण, दि. १६ : सणासुदीच्या काळात एक महिन्याचा पगार थकीत राहिल्याने मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आज सकाळी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. प्रशासनाला पूर्वसूचना न देता सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ नगरपालिका स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झाला. अखेर नगराध्यक्षा ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी थकीत पगार देण्याची ग्वाही दिल्यानंतर सुमारे पाच तासांनी कामगारांनी आंदोलन मागे घेत कामावर हजेरी लावली.
मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांचा एक महिन्याचा पगार ठेकेदाराकडून थकीत असल्याचे कामगारांनी सांगितले. सणासुदीच्या काळातही पगार वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती मिळताच उबाठा शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर तसेच अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी नगरपालिकेत जाऊन कामगारांची भूमिका जाणून घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी कामगारांनी ठेकेदाराकडून त्यांच्या बँक खात्यावर पगारापोटी पाठवण्यात आलेली काही रक्कम रोख स्वरूपात परत घेतली जात असल्याचा आरोप केला. कामगारांना ठरल्याप्रमाणे पूर्ण पगार मिळाला पाहिजे, तसेच परत मागितलेली रक्कमही कामगारांना मिळाली पाहिजे, अशी भूमिका नगरसेवक महेंद्र म्हाडगुत आणि तपस्वी मयेकर यांनी मांडली. या प्रकाराबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांनी नगरपालिकेत धाव घेत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर आणि बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीही नगरपालिकेत दाखल होत कामगारांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान कामगारांचा थकीत पगार देण्याचे आश्वासन देण्यात आले.
आश्वासन मिळाल्यानंतर कामगारांनी सुमारे पाच तासांनंतर कामबंद आंदोलन मागे घेतले आणि पुन्हा आपल्या कामावर हजर झाले.






