रानभाज्यांचे संवर्धन काळाची गरज; नव्या पिढीला त्यांची ओळख करून देण्याचे आवाहन
मालवण, दि. १६ : निसर्गाने आपल्याला मोफत दिलेला आणि औषधी गुणांनी समृद्ध असलेला मोठा खजिना म्हणजे रानभाज्या. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात. काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या निसर्गदत्त भाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देतानाच त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रानभाजी अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, उमेद आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने माळगाव हायस्कूलच्या सभागृहात तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, क्षमा हडकर, पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, माळगाव सरपंच चैताली साळकर, मठबूद्रूक सरपंच मोहन वेंगुर्लेकर, वडाचापाट सरपंच सोनिया प्रभूदेसाई, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, वेरळ सरपंच धनंजय परब, शेतकरी सल्ला समिती मालवण अध्यक्ष प्रताप चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाटील, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, माळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय खोत, मंडळ कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी फास्ट फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांकडे लक्ष वेधले. महिलांनी आपल्या आहारात रानभाज्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. संजय खोत यांनीही आहारात पालेभाज्यांचा समावेश करण्याचे आवाहन करताना, “निसर्ग जपा आणि निरंतर टिकवा,” असा संदेश दिला.
पंचायत समिती सदस्य दीपक चव्हाण, प्रताप चव्हाण आणि अरुण भोगले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
‘शेवग्याच्या घारग्यां’ना प्रथम क्रमांक
रानभाजी महोत्सवानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत माळगावच्या रत्ना राजेश लब्दे यांनी तयार केलेल्या शेवग्याच्या घारग्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक टाकळा लाडू या पदार्थासाठी चांदेर येथील नमिता महेश मूळीक यांनी मिळवला. तृतीय क्रमांक खेरवंद येथील अर्चना अतुल जोशी यांच्या कूड्याच्या शेंगाची भाजी आणि चटणी या पदार्थाला मिळाला.
उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये कूमामे येथील गौरव गणेश मूणगेकर यांच्या कूर्डू रोल तसेच वडाचापाट येथील निकीता मंगेश पाताडे यांच्या उंबराच्या फळाची भाजी यांची निवड करण्यात आली.
सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण रानभाजी तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे आणि आरती कांबळी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यांनी मानले.






