मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ गावातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी गावाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह केलेल्या या पाहणी दौऱ्यात रस्ते, स्मशानभूमी, व्यायामशाळा तसेच स्वयंभू श्री भूतनाथ मंदिराच्या विकासाबाबत ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी दत्ता सामंत यांची भेट घेऊन प्रश्न मांडले होते. ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत सामंत यांनी प्रत्यक्ष गावात येऊन संबंधित कामांची पाहणी केली.
दौऱ्यात बोडवे वाडी घाटी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक वळविण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे या रस्त्यासाठी निधी कोणत्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो, तसेच भविष्यात त्याचा मोठ्या आणि सक्षम मार्गात विकास करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.
यानंतर खासदार नारायण राणे यांच्या निधीतून सुरू असलेल्या वायरी-भूतनाथ स्मशानभूमीच्या कामाची पाहणी करण्यात आली. कामाची एकूण स्थिती समाधानकारक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. मात्र काही भागात पेव्हर ब्लॉक बसविणे आणि लेव्हलिंगचे काम बाकी असल्याचे निदर्शनास आले. आवश्यक लेव्हलिंग करून लवकरच पेव्हर ब्लॉक बसविण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.
गावातील तरुणांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली व्यायामशाळेची मागणीही यावेळी पुढे आली. सामंत यांनी तातडीने संबंधित सीओ यांच्याशी संपर्क साधून भूतनाथ शाळेतील दोन वर्गखोल्या व्यायामशाळेसाठी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले. आवश्यक कागदपत्रे व प्रस्ताव सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
त्यानंतर सामंत यांनी स्वयंभू श्री भूतनाथ मंदिराला भेट देऊन ग्रामस्थ आणि मंदिराच्या मानकरी मंडळाशी चर्चा केली. मंदिराच्या पुनर्रचनेसह सभामंडपापुढील नवीन बांधकामाबाबत मानकरी मंडळाने विविध सूचना मांडल्या. सभामंडपाचे मोजमाप घेऊन वास्तुविशारदाच्या माध्यमातून मंदिराच्या पुढील विकासाचा सुसंगत आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध पर्यायांचा विचार करून मंदिराच्या विकासाची पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.
याशिवाय गावातील अन्य विविध विकासकामांबाबतही ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. जिल्हाप्रमुखांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या दौऱ्यामुळे वायरी-भूतनाथमधील नागरिक आणि तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विकासकामांसाठी तत्परतेने पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे आभार मानले.
या पाहणी दौऱ्यावेळी देवानंद लोके गावकर, कृष्णा देवुलकर, काशनाथ मांजरेकर, मनोहर पाटकर, राजन चव्हाण, मुन्ना झाड, विकी लोके गावकर, किरण बोडवे, जीवन मसुरकर, वैभव मसुरकर, ग्रामपंचायत सदस्य विकास मसुरकर, चैतन्य बोडवे, साहिल बोडवे, गजानन बोडवे, प्रथमेश बोडवे, अक्षय देऊलकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते.
वायरी-भूतनाथच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेल्या या पाठपुराव्यामुळे गावातील विविध प्रलंबित कामांना नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.







