मालवण, प्रतिनिधी : मालवण दांडी येथील झालझुलवाडी परिसरात वीज पोलावरील वीज वाहिनी तुटून खाली पडल्याने एक युवक थोडक्यात बचावल्याची घटना आज सायंकाळी घडली. या परिसरात वीज वाहिन्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असूनही महावितरणकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. या समस्येबाबत जाब विचारण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी मालवण वीज कार्यालयावर धडक देण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
झालझुलवाडी येथे दोन दिवसांपूर्वीही वीज वाहिनी तुटून पडली होती. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी ती पुन्हा जोडली. मात्र, आज सायंकाळी त्याच परिसरात पुन्हा वीज वाहिनी तुटून खाली पडली. यावेळी तेथून जाणारा एक युवक वीज वाहिनी अंगावर पडण्यापासून थोडक्यात बचावला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकत्र येत संताप व्यक्त केला.
स्थानिक नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जगदीश खराडे, संदीप मालंडकर, नारायण धुरी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
झालझुलवाडी, श्रीकृष्णवाडी तसेच दांडी परिसरातील किनारी भागातील वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. या वाहिन्या बदलण्याची मागणी गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, महावितरणकडून अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
किनारी भागात घरे, मच्छिमारी होड्या आणि मासेमारीचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने वीज वाहिनी तुटून त्यावर पडल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या परिसरात नागरिकांचा वावर असल्याने जीवितहानीचाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही महावितरणकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जीर्ण वीज वाहिन्या तातडीने बदलण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना करावी, या मागणीसाठी १४ ऑगस्ट रोजी मालवण वीज कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.






