मालवण, प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने वायरी-मालवण येथील अंबाजी प्राथमिक शाळेतील ३४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना खाऊ तसेच वही, पेन आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांकडून विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवित गरजू घटकांना मदतीचा हात देण्यात येत आहे.
याच सेवाभावी उपक्रमाचा भाग म्हणून अंबाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाली असून, त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणच्या सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, दिक्षा गांवकर, मिताली मोंडकर, महेश अंधारी, गणेश प्रभुलकर, विश्वास गांवकर, चौकेकर सर, खोत मॅडम यांच्यासह शिक्षक, लायन्स क्लबचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी, दातृत्व आणि सेवाभावाची परंपरा जपत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्याचा लायन्स क्लबचा उपक्रम कौतुकास्पद ठरला.






