स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोळंब येथे प्रकाशन सोहळा; साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन
मालवण, दि. प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कोकणातील सुप्रसिद्ध कवी रुजारीओ पिंटो यांच्या पहिल्यावहिल्या ‘माँ मेरी’ या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालवण-कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तमाम काव्यप्रेमी आणि साहित्यिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी कवी रुजारीओ पिंटो आणि आगोस्तीन डिसोझा उपस्थित होते.
या हिंदी कवितासंग्रहाचे प्रकाशन कवी पिंटो यांचे भंडारी हायस्कूलमधील माजी हिंदी शिक्षक रवींद्र वराडकर यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रभाषा पंडित कृष्णा मालंडकर यांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली असून, ते कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत. कोकण मराठी साहित्य परिषद आणि साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
रत्नागिरी येथील ‘सत्वश्री प्रकाशन’ (कोकण मीडिया कन्सल्टन्सी)चे प्रमोद कोनकर यांनी पुस्तक प्रकाशित केले असून, आकर्षक मुखपृष्ठ प्रवीण पवार यांनी साकारले आहे.
मालवणी संस्कृती हिंदीच्या माध्यमातून देशभर नेण्याचा प्रयत्न
यावेळी बोलताना कवी रुजारीओ पिंटो म्हणाले की, मराठी, मालवणी आणि कोंकणी भाषेत आजवर लिहिलेल्या कविता व कथांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालवणी संस्कृती आणि लोकजीवन केवळ कोकणापुरते मर्यादित न राहता राष्ट्रभाषेच्या माध्यमातून देशभरातील रसिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ‘माँ मेरी’ हा हिंदी कवितासंग्रह साकारल्याचे त्यांनी सांगितले.
या कवितासंग्रहात ८६ निवडक कवितांचा समावेश आहे. ‘माँ मेरी’ हे शीर्षक एका बाजूला आईच्या मायेची अनुभूती व्यक्त करते, तर दुसऱ्या बाजूला कवीच्या आईचे नाव ‘मेरी’ असल्याने या शीर्षकाला विशेष भावनिक संदर्भ लाभला आहे.
मालवणवासीय, साहित्यप्रेमी तसेच हिंदी भाषाप्रेमींनी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे उपस्थित राहून प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.






