सिंधुदुर्गनगरी, दि. १३ (जिमाका) : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत ‘आवास प्लस सर्वेक्षण २०२४’ मधील स्वयं-सर्वेक्षण प्रकरणांचे नियुक्त सर्वेक्षकांमार्फत पुष्टीकरण तसेच तपासणीमध्ये फ्लॅग झालेल्या प्रकरणांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्वेक्षणादरम्यान अपात्र आढळलेल्या कुटुंबांना वगळण्यासाठी ‘डिलेशन मॉड्यूल’ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मसुदा कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (ड्राफ्ट PWL) अंतिम करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ग्रामसभेची मान्यता घेऊन संपूर्ण प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करणे अपेक्षित असून, ग्रामसभेच्या अजेंड्यामध्ये कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) करण्याचा विषय समाविष्ट करावा. मसुदा प्रतीक्षा यादी ग्रामसभेसमोर सादर करून लाभार्थ्यांच्या पात्रतेची तथ्याधारित (Fact-based) पडताळणी करावी.
ग्रामसभेने सुचविलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीत (Beneficiary Facts) आवश्यक शिफारशी आणि बदलांची सुधारणा करावी. तसेच ग्रामसभा बैठकीची Geo-tagged आणि Timestamp असलेली तीन स्वतंत्र छायाचित्रे अपलोड करावीत.
ग्रामसभा कार्यवाहीचा नमुना (Proceeding Template) प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे तयार होणार आहे. त्यावर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांच्या स्वाक्षऱ्या व अधिकृत शिक्का घेऊन तो पुन्हा प्रणालीवर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






