कणकवलीतील बांधकरवाडी येथील शासकीय वसतिगृहात विविध प्रवर्गांसाठी जागा उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत बांधकरवाडी, कणकवली येथे इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
सन २०२६-२७ साठी या वसतिगृहात विविध प्रवर्गांनुसार जागा उपलब्ध आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी ३१ टक्के आरक्षण असून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी २२, तर बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९ जागा उपलब्ध आहेत. प्रवर्गनिहाय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १२ आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ९ जागा आहेत.
विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी २० टक्के आरक्षण असून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १४, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ६, प्रवर्गनिहाय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ४ आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ६ जागा उपलब्ध आहेत.
विशेष मागास प्रवर्गासाठी ४ टक्के आरक्षण असून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १, प्रवर्गनिहाय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३ आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १ जागा उपलब्ध आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी २ टक्के आरक्षण असून व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १, तसेच प्रवर्गनिहाय व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १ जागा आहे. अनाथांसाठी १ टक्के आरक्षण असून व्यावसायिक तसेच प्रवर्गनिहाय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १ जागा उपलब्ध आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) २ टक्के आरक्षण असून व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १ जागा उपलब्ध आहे.
पात्रता काय?
महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. विद्यार्थ्याने संबंधित प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आणि वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. यासाठी तहसीलदारांचे उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
गुणवत्तेनुसार प्रवेश
उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि संबंधित प्रवर्गासाठी विहित आरक्षणानुसार वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशासाठी इयत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे.
सन २०२६-२७ मध्ये बारावीनंतरच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. तसेच पदवीनंतरच्या एम.ए., एम.एस्सी. यांसारख्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.
३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज
पात्र विद्यार्थ्यांनी ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करावेत. अर्जासाठी hmasnew.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रत इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, बांधकरवाडी, कणकवली येथे जमा करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन विभागाने केले आहे.






