जयराम जाधव, फिजा मकानदार आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेची निवड
सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार २०२४-२५ जाहीर करण्यात आला आहे. युवक, युवती आणि संस्था या तीन प्रवर्गांतील पुरस्कारार्थींची निवड जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीने केली आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांची छाननी, गुणांकन आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून एकूण आठ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यामध्ये चार संस्था, दोन युवक आणि दोन युवतींच्या प्रस्तावांचा समावेश होता.
युवक प्रवर्गात जयराम जाधव
युवक प्रवर्गात सावंतवाडी तालुक्यातील मिरवडे येथील जयराम आत्माराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य केले आहे.
गरजू आणि वंचित घटकांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान जनजागृती, औषधे व जीवनावश्यक साहित्याचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा ठसा उमटविला आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.
युवती प्रवर्गात फिजा मकानदार
युवती प्रवर्गात सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिजा अब्दुल मकानदार यांची निवड झाली आहे. त्यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, कला आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
मोफत आरोग्य शिबिरे, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान, वृक्षारोपण, युवा नेतृत्व व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, तंबाखूविरोधी उपक्रम तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची युवती प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे.
संस्था प्रवर्गात कोकण कला व शिक्षण विकास संस्था
संस्था प्रवर्गात ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग’ यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, दुर्बल घटकांसाठी कार्य, आपत्ती व्यवस्थापन, युवा विकास, पर्यावरण, आरोग्य तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.
विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये सातत्याने केलेल्या बहुआयामी आणि व्यापक कार्याची दखल घेत संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्काराचे स्वरूप
युवक आणि युवती प्रवर्गातील पुरस्कारार्थींना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपये रोख, तर संस्था प्रवर्गातील पुरस्कारार्थी संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पोलीस कवायत मैदान, ओरोस येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील युवक, युवती आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या कार्यातून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, हा जिल्हा युवा पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे.
बैठकीस क्रीडा व युवक उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांच्यासह जिल्हास्तरीय युवा पुरस्कार समितीचे सदस्य उपस्थित होते.






