जलक्रीडा हंगाम २०२६-२७ पूर्वी संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळा; पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
सिंधुदुर्गनगरी, दि. १२ : जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या जलक्रीडा हंगामाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातील जलक्रीडा पर्यटन अधिकृत, सुरक्षित आणि नियमबद्ध पद्धतीने चालवण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात जलक्रीडा हंगाम २०२६-२७ पूर्वी आयोजित संयुक्त मार्गदर्शन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, जलक्रीडा व्यावसायिक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
जिल्ह्यात पर्यटन वाढल्याने स्थानिक रोजगाराला चालना मिळाली आहे. मात्र, सागरी किनारपट्टीवरील अपघातांचा धोका लक्षात घेता पर्यटकांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अवैध जलक्रीडा व्यवसाय चालू दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सर्व जलक्रीडा व्यावसायिकांनी नियमावलीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि निश्चित शुल्क भरून अधिकृत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
अधिकृत नोंदणीमुळे आपत्कालीन परिस्थितीत संबंधित व्यावसायिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचवणे शक्य होईल. तसेच पर्यटकांची संभाव्य फसवणूक रोखण्यासही मदत होणार आहे.
बोटींचे फिटनेस प्रमाणपत्र, सुरक्षा साधने आवश्यक
कार्यशाळेत विविध विभागांकडून जलक्रीडा व्यवसायाच्या व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन आणि विभागांमधील समन्वयाबाबत माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून बोटींची नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र तसेच आवश्यक सुरक्षा उपकरणांची उपलब्धता अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पोलीस विभागाने सागरी सुरक्षेबाबतच्या उपाययोजना तसेच अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांवरील कारवाईबाबत सूचना दिल्या.
पर्यटन संचालनालयाने जलक्रीडा व्यवसायासाठी आवश्यक ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.
जलक्रीडा व्यावसायिकांसाठी व्हॉट्सॲप समूह
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कायदा व सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच अनुपस्थित जलक्रीडा व्यावसायिकांपर्यंत नियमावली पोहोचविण्यासाठी आणि हवामानाचे इशारे वेळेवर मिळण्यासाठी सर्व जलक्रीडा व्यावसायिकांचा संपर्क डेटाबेस तयार करून अधिकृत व्हॉट्सॲप समूह तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जलक्रीडा हंगामात प्रशासन, पोलीस, मेरीटाइम बोर्ड, पर्यटन विभाग आणि व्यावसायिक यांच्यात सातत्याने समन्वय राहावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
सुरक्षित जलक्रीडा, अधिकृत व्यवसाय आणि पर्यटकांची सुरक्षा या तीन बाबींवर प्रशासनाने आगामी हंगामात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.






