मालवण : प्रतिनिधी
वायरी गावाचे वाडीवार रूपांतर झालेल्या प्रकरणाची फाईल मिळावी, या मागणीसाठी वायरी येथील रहिवासी दत्तात्रय हरिश्चंद्र मयेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी मालवण तहसील कार्यालयासमोर संविधान वाचन उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
वायरी गावाचे वाडीवार रूपांतर झालेल्या प्रकरणाची फाईल मिळावी, अशी मागणी मयेकर यांनी मालवण तहसील कार्यालयाकडे केली होती. मात्र, संबंधित प्रकरणाची फाईल उपलब्ध होत नसल्याचे उत्तर तहसील कार्यालयाकडून देण्यात आल्याचे मयेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत लोकआयुक्त व उपलोकआयुक्त कार्यालयाने सुनावणी न घेता निकाल दिल्याचा मयेकर यांचा आरोप आहे. हा निकाल मान्य नसल्याने त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले. मात्र, अद्याप याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच आमदार निलेश राणे यांच्याकडे जनता दरबारात निवेदन देऊनही अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नसल्याचे मयेकर यांनी सांगितले.
या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची फाईल उपलब्ध करून देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी मालवण तहसील कार्यालयासमोर संविधान वाचन उपोषण करणार असल्याचे मयेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.






