
मालवण : प्रतिनिधी
‘एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी’ या भावनेतून मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल २५ हजार राख्या तयार करून देशाच्या सीमेवर विविध ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना पोस्टाद्वारे पाठविल्या. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सैनिकांप्रति प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम महाविद्यालयातर्फे सलग दहाव्या वर्षी राबविण्यात आला.
भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात सैनिकांना राख्या पाठविण्याचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती माता, भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सेवानिवृत्त सैनिक पी. टी. परब व विष्णू ताम्हाणेकर, मालवणचे पोस्टमास्तर श्री. देसाई, डेप्युटी पोस्टमास्तर श्री. पुलसुंगे, संस्थेच्या कौन्सिल ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य रामदास मयेकर, प्राचार्य आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. पवन बांदेकर, पालक दीपा नितीन राऊत, माजी विद्यार्थी सौगंधराज बादेकर, भूषण मेतर, भार्गव खराडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. पवन बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. सर्वाधिक राख्या तयार करणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये तनिष्का केळूसकर हिने प्रथम, रुची कांबळी हिने द्वितीय तर लक्ष्मी दरगुडे हिने तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. शौर्या कांबळी, दिया गोलतकर आणि हर्षिता तारी यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली.
तहसीलदार गणेश लव्हे यांनी सैनिक देशाच्या सीमेवर अत्यंत खडतर, क्लेशदायक आणि अनिश्चित परिस्थितीत राहून देशाचे संरक्षण करत असल्याचे सांगितले. सैनिकांप्रति आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी राखी पाठविण्याचा भंडारी कॉलेजचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी सैनिकांचा आदर्श घेऊन चांगले नागरिक बनत देशसेवेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांनी सैनिक देशासाठी प्राणांची आहुती देण्यास सदैव तयार असतात. अशा सैनिकांना आपल्या माणसांकडून राखीच्या माध्यमातून प्रेमाची भेट मिळाल्याने त्यांना निश्चितच आनंद होतो, असे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.
सेवानिवृत्त सैनिक पी. टी. परब यांनी विद्यार्थिनींनी पाठविलेल्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यातील प्रेम आणि ताकद आणखी वाढलेली असेल, असे भावनिक उद्गार काढले. मालवणमधील आजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमधून उद्याचे सैनिक घडले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विष्णू ताम्हाणेकर यांनी आजचे युवक हे देशाचे पुढील आधारस्तंभ असून, प्रत्येकाने आपल्या छोट्या-छोट्या कृतीतून देशसेवा करत राहावे, असे आवाहन केले.
प्राचार्य आर. डी. बनसोडे आणि रामदास मयेकर यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राजक्ता परब-पवार यांनी केले, तर श्री. गोसावी यांनी आभार मानले.
राखीच्या धाग्यातून सीमेवर तैनात सैनिकांपर्यंत प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेचा संदेश पोहोचविणाऱ्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासोबतच समाजासमोरही एक आदर्श निर्माण केला आहे.






