मालवण | प्रतिनिधी
महावितरणकडून सुरू असलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसविण्याच्या कार्यवाहीविरोधात वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी मालवण येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अभियंत्यांना जाब विचारला. “कुठल्याही परिस्थितीत वायरी गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून भविष्यात ‘प्रिपेड सिस्टीम’ लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, तेथे दुप्पट-तिप्पट वीजबिल येत असल्याच्या तक्रारी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या वापरात असलेले डिजिटल मीटर सुरळीतपणे सुरू असताना नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची आवश्यकता काय, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध किंवा सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन मेहेत्रे यांनी प्रशासनाची बाजू मांडली. स्मार्ट मीटर योजना ही केंद्र शासनाची योजना असून, त्याद्वारे ‘टाईम ऑफ द डे’ नियमावली लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, शॉर्टसर्किटसारख्या घटना घडल्यास त्याची माहिती तत्काळ मिळण्यास मदत होते. तसेच अचूक वीजबिलासाठीही स्मार्ट मीटर उपयुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आतापर्यंत ७ हजार ४०० ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविले असून, हे मीटर ग्राहकांच्या फायद्याचेच आहेत,” असे मेहेत्रे यांनी सांगितले.
मात्र महावितरणची बाजू ऐकल्यानंतरही ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. वायरी-भूतनाथमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी गावात फिरकू नये, अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
यावेळी वायरी-भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगावकर, ग्रामपंचायत सदस्य तेजस लुडबे, देवानंद लुडबे, देवानंद लोकेगावकर, मनोज लुडबे, संजय लुडबे, पराग माणगावकर, विश्वास लुडबे, एकनाथ फणसेकर, गणपत म्हसकर, राजाराम माडये, आनंद गावडे, समीर तळगावकर, दर्शन वेंगुर्लेकर, प्रकाश सावंत, गणेश परब, दीपक कुडाळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






