मालवण (प्रतिनिधी)
मालवण मेढा येथे पहाटेच्या सुमारास जखमी अवस्थेत आढळलेल्या मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill) पक्ष्याला वन्यजीवप्रेमी आणि संबंधित विभागाच्या तत्परतेमुळे उपचार मिळाले. भूषण परब, नागेश परब, आशिष चव्हाण आणि केतन केणी यांना हा पक्षी जखमी अवस्थेत आढळला.
नागेश परब यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे फॉरेस्टर सदानंद परब यांना याबाबत कळविण्यात आले. इकोमेट्सचे सदस्य सागर धुरी यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी धनेश पक्ष्याला रेस्क्यू केले. त्यानंतर प्रथमोपचारासाठी त्याला कांदळवन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.
रीफ वॉच मरीनचे कन्झर्वेशन पशुवैद्य डॉ. अजू अलेक्झांडर यांनी पक्ष्यावर तातडीने उपचार केले. उपचारानंतर हा पक्षी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेमार्फत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आला.
मलबारी कवड्या धनेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा पक्षी असून तो प्रामुख्याने सदाहरित आणि पानगळीच्या जंगलात आढळतो. जंगलालगतच्या लहान नागरी भागांमध्येही मोठ्या झाडांवर त्याचे दर्शन होते. या पक्ष्याचा विणीचा हंगाम एप्रिल ते जूनदरम्यान असतो. मलबारी कवड्या धनेश पक्षी आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतो, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या सदस्यांनी दिली.
जखमी पक्ष्याला वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचविण्यास मदत झाली. नागरिकांनी जखमी किंवा संकटात सापडलेले वन्यजीव आढळल्यास स्वतः हाताळण्याऐवजी तातडीने वनविभाग किंवा वन्यजीव बचाव संस्थांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.






