कामगिरीवरील शिक्षकाचा कार्यमुक्ती आदेश रद्द होईपर्यंत शाळा सुरू न करण्याचा पालकांचा निर्धार
मालवण (प्रतिनिधी) — आचरा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील शिक्षकांच्या प्रश्नावरून पालक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शाळेला पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी ६ ऑगस्टपासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कामगिरीवर नियुक्त केलेल्या शिक्षकाचा कार्यमुक्ती आदेश रद्द करावा किंवा मूळ शिक्षिकेला पुन्हा शाळेत रुजू करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्धार शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
आचरा येथील उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून, सुमारे ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापूर्वी शाळेत तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र, येथील शिक्षिका नसरीन अब्दुल करीम ख्वाजा यांची कामगिरीवर जिल्हा परिषद शाळा, सावंतवाडी उर्दू येथे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झाराप येथील शिक्षक इरफान मोहम्मद फकीर शेख यांची आचरा उर्दू शाळेत कामगिरीवर नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, कोणतीही पूर्वकल्पना न देता इरफान शेख यांना त्यांच्या मूळ शाळेत हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचा आदेश देण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे आचरा उर्दू शाळेत पुन्हा शिक्षकांची कमतरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
या प्रश्नाबाबत पालकांनी ६ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिक्षकांची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इरफान शेख यांचा कार्यमुक्ती आदेश रद्द करावा किंवा मूळ शिक्षिका नसरीन ख्वाजा यांना पुन्हा आचरा उर्दू शाळेत रुजू करावे, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती ग्रामस्थ व पालक इमू मुजावर यांनी दिली.






