मालवण | प्रतिनिधी
पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान आणि भातशेतीला नवी ऊर्जा देण्याच्या उद्देशाने प्रगत शेतकरी गट, काळसे यांच्या वतीने भात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात मान्यवरांसह पर्यटक आणि स्थानिकांनी चक्क शेताच्या चिखलात उतरून भाताची रोपे लावली. त्यामुळे काळसेच्या शेतशिवारात दिवसभर उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगळ्यावेगळ्या महोत्सवाला कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, धामापूरच्या सरपंच परब, काळसेच्या सरपंच काळसेकर, आत्मा अध्यक्ष प्रताप चव्हाण, माधुरी कुडाळकर, आनंदाश्रय अणावाचे संस्थापक बबन परब, शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष गावडे, उद्यान पंडित पुरस्कार विजेते उत्तम फोंडेकर, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, प्रगत शेतकरी गटाचे अध्यक्ष श्यामसुंदर मालवणकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे, कृषी सेविका स्नेहा खोत, ग्रामविकास अधिकारी शेलटकर आणि माजी विस्तार अधिकारी विनायक चव्हाण आदी उपस्थित होते. याशिवाय शंभरहून अधिक शेतकरी आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सकाळपासूनच काळसे येथील शेतशिवारात भात लावणीला सुरुवात झाली. उपस्थित लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत चिखलात उतरून भाताची रोपे लावली. ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा आणि शेतकऱ्यांच्या अथांग मेहनतीची जाणीव करून देणारा हा अनुभव पर्यटकांसाठीही विशेष ठरला.
शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे शेतीपासून दुरावत चाललेल्या नव्या पिढीला पारंपरिक भातशेतीची ओळख व्हावी, शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान व्हावा आणि त्यातून ग्रामीण पर्यटनाला चालना मिळावी, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिवसभर चाललेल्या या उपक्रमात कृषी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी आणि पर्यटक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेता आल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. काळसे येथील भात लावणी महोत्सवाची ही आगळीवेगळी परंपरा दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.





