मालवण | प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. पूर्वजांनी मोठ्या त्यागातून मिळवून दिलेले स्वातंत्र्य जपणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. पिरावाडीचे सुपुत्र वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या बलिदानाचे सदैव स्मरण ठेवून देशाचा तिरंगा सदैव उंच फडकवत ठेवूया, असे आवाहन आचरा पोलीस निरीक्षक संजय कातिविले यांनी केले.
क्रांती दिनानिमित्त आचरा-पिरावाडी येथे वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा आचरा-पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या अर्धपुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्यासह अकरा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींनाही यावेळी अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या त्याग, शौर्य आणि देशनिष्ठेचे स्मरण करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी क्रांतीची मशाल ज्योत प्रज्वलित करून गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून देतानाच देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि स्वातंत्र्याच्या जपणुकीचा संदेश या जनजागृती फेरीतून देण्यात आला. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची ज्योत आणि राष्ट्रप्रेमाची मशाल पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास आचरा पोलीस निरीक्षक संजय कातिविले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम पडवळ, ग्रामोन्नती मंडळ आचरा-पिरावाडीचे अध्यक्ष नारायण कुबल, उपाध्यक्ष मंदार खोबरेकर, सचिव वैभव कुमठेकर, परेश तारी, जय कुबल, ग्रामपंचायत सदस्य पूर्वा तारी, पोलीस पाटील तन्वी जोशी, डॉ. प्रमोद कोळंबकर, अनिल करंजे, गिरीधर सारंग, सुरेंद्र कुबल, पिरावाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. बुगडे व कर्मचारीवृंद, धनश्री पराडकर, कविता बिर्जे, जिल्हा परिषद शाळा पिरावाडीचे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, विजय जोशी, नंदू तळवळकर यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कुबल यांनी केले.






