मालवण | प्रतिनिधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ मालवणतर्फे रेवतळे-मालवण येथील फाटक शाळेत शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण हिने प्रथम क्रमांक पटकावला. भाविका धीरज सोनगत हिने द्वितीय, तर हार्दिक महेश दाभोलकर याने तृतीय क्रमांक मिळविला. समृद्धी कैलास माने आणि संचित कमलाकांत मसुरकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, सचिव पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, ज्येष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी यांच्यासह लायन्स क्लबचे अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच शिक्षक देविदास नामदेव प्रभुगांवकर, महादेव श्रीहरी घोडके आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्व पारितोषिकांचे प्रायोजकत्व लायन्स क्लबच्या ज्येष्ठ सदस्या जयश्री हडकर यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानत कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाची आवड निर्माण करण्याबरोबरच राष्ट्रपुरुषांच्या विचारांप्रती आदर आणि आत्मविश्वास वाढविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील लायन्स क्लब ऑफ मालवणच्या कार्याला या उपक्रमातून आणखी एक सकारात्मक दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.






