मालवण | प्रतिनिधी
क्रांती दिनानिमित्त मालवण-कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
यावेळी हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमास कुंभारमाठच्या सरपंच पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, तलाठी परब, मुख्याध्यापक संजय खोचरे, यशवंत गावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रांती दिनाच्या निमित्ताने हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा आणि देशसेवेच्या भावनेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.






