मालवण | प्रतिनिधी
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम (वय ६५) यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
विनोद कदम हे मुंबई मंत्रालयात सेवेत कार्यरत होते. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातच अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने त्यांनी वडिलांच्या नावाने जयवंती बाबू फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सुकळवाड येथे एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यात आले. संस्थेच्या उभारणीपासून ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज तसेच जयवंती बाबू फाउंडेशनच्या परिवारावर शोककळा पसरली आहे.
विनोद कदम यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले असून, सोमवारी सकाळी मुंबई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.






