जागतिक आदिवासी दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळाचा सेवाभावी उपक्रम
मालवण | प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार युवा मंडळ, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीत अन्नदान व वस्त्रदानाचा सेवाभावी उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यासोबतच माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार युवा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कातकरी वस्तीत प्रत्यक्ष भेट देत अन्न व वस्त्रांचे वाटप केले. यावेळी त्यांनी कातकरी बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, गरजा आणि समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत सामाजिक आधार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
अन्नदान आणि वस्त्रदानामुळे कातकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. केवळ वस्तूंचे वाटप न करता गरजू घटकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्याप्रती असलेली आपुलकी व्यक्त करण्यात आली.
या सेवाभावी उपक्रमास लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पुनम चव्हाण, उपाध्यक्ष मनाली दळवी, मीना घुर्ये, फॅनी फर्नांडिस, राजा शंकरदास, विश्वास गांवकर यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.
तसेच पाटीदार युवा मंडळाचे इमिजंट पास्ट प्रेसिडेंट शांती पटेल, प्रेसिडेंट सत्यम पटेल, सेक्रेटरी रोहित पटेल, खजिनदार सार्थक पटेल, लक्ष्मी लुडबे तसेच कातकरी वस्तीतील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकाऱ्यांनी समाजातील गरजू घटकांशी नाते जोडणे आणि त्यांच्या अडचणींमध्ये सहभागी होणे हेच सेवाकार्याचे खरे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. पाटीदार युवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत भविष्यात अशा सेवाभावी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.






