मुंबई, दि. ७ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने मोठी तयारी केली असून, ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या जादा वाहतुकीच्या नियोजनाबाबत एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी जोडलेला सण असून, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी सज्ज असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. या जादा बसेसचे आरक्षण अधिकृत संकेतस्थळ तसेच ‘MSRTC Bus Reservation’ या मोबाईल ॲपद्वारे करता येणार आहे.
१० ऑगस्टपासून गट आरक्षण
किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. गट आरक्षणात महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख बसस्थानके आणि थांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातील प्रमुख महामार्गांवर वाहनदुरुस्ती पथके तैनात करून प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड एसटी सेवा देण्याची तयारी महामंडळाने केली आहे.





