मालवण (प्रतिनिधी)
चौके पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. एनडीआरएफ ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्या वतीने निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. गोसावी यांनी केले. प्रशिक्षणादरम्यान विविध नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करावे, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
एनडीआरएफच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील विविध प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांना करून दाखविली. या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीच्या काळात प्रसंगावधान राखणे, स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि योग्य पद्धतीने बचावकार्य करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या प्रशिक्षणाचा लाभ प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला. प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके यांच्या वतीने एनडीआरएफ ५ बटालियन टीम ५/०, पुणे येथील सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.





