मालवण : प्रतिनिधी
कोळंब-भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार, श्रावणी एकादशी तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नामांकित भजन मंडळांचे भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाची सुरुवात १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, न्हिवे यांच्या भजनाने होणार आहे. या भजनाचे नेतृत्व बुवा राजू दळवी करणार आहेत.
२३ ऑगस्ट रोजी श्री ग्रामदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव यांचे भजन होणार असून बुवा प्रवीण परुळेकर आणि पखवाज साथ मंथन पाटकर यांची असेल. २४ ऑगस्ट रोजी श्री बलभीम प्रासादिक भजन मंडळ, सर्जेकोट यांचे भजन होणार असून बुवा रोहित आडकर व पखवाज साथ ताता आचरेकर करणार आहेत.
३१ ऑगस्ट रोजी श्री बाळ गोपाळ प्रासादिक भजन मंडळ, आचरा-वरची चावडी यांचे भजन होणार असून बुवा मंदार आचरेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
४ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सायंकाळी ७ वाजता श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी यांचे भजन होणार आहे. बुवा भालचंद्र केळुसकर असून पखवाज साथ किरण कुर्लेकर करणार आहेत. त्यानंतर रात्री १० वाजता विवेक वायंगणकर यांचे कीर्तन होईल. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
तसेच ७ सप्टेंबर रोजी श्री लिंगनाथ प्रासादिक भजन मंडळ, पोखरण यांचे भजन होणार असून बुवा समीर कदम सहभागी होणार आहेत.
या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





