मालवण (प्रतिनिधी)
वडाचापाट येथील देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये आयोजित रानभाजी पाककला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रानभाज्यांपासून विविध नावीन्यपूर्ण आणि चविष्ट पाककृती सादर केल्या.
स्पर्धेत सिद्धी भरत पालव हिने लाजरीच्या पानांचे कटलेट सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. चैताली मंगेश पाताडे हिने उंबराच्या फळांची भाजी सादर करत द्वितीय क्रमांक मिळविला. तर हितेश संभाजी वायंगणकर याने आघाड्याच्या पानांची भाजी आणि नेहा सतीश पालव हिने शेवग्याच्या पानांचे पराठे सादर करून तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अळूवडी, मिक्स भाजी, शेवग्याच्या पानांचे पराठे, शेवग्याच्या पानांची भजी, टाकळाची वडी, फोडशीची भजी, घोटीच्या वेलीची भाजी, अळूच्या गाठी, टाकळ्याची भजी, कुईवडी, दुदुर्त्याची भाजी आणि पेवगा पराठा अशा विविध पाककृती सादर केल्या.
उत्तेजनार्थ क्रमांकामध्ये कनिका मंगेश पाटकर हिच्या टाकळाच्या कटलेटला, वैदेही श्रीनिवास हडकर हिच्या शेवग्याच्या पानांच्या भजीला आणि अदिती दिनेश कदम हिच्या अळूवडीला अनुक्रमे क्रमांक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शिक्षिका वेदिका दळवी आणि प्रतिभा केळुसकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रानभाज्यांचे पौष्टिक महत्त्व आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.





