मालवण | प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथे शनिवार, ८ ऑगस्ट रोजी श्री स्वामीसुत महाराजांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १६० वर्षांनंतर प्रथमच स्वामीसुत महाराजांच्या पादुका कोकणात येत असल्याने हा सोहळा स्वामीभक्तांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
मुंबईतील चेंबूर येथील श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठातून या पादुका श्री क्षेत्र खोटले येथे आणल्या जाणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांनी पुत्रवत मानलेल्या स्वामीसुत महाराजांनी ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा दशाक्षरी मंत्र तसेच स्वामी समर्थांवरील अनेक अभंग, आरत्या आणि स्तोत्रांची रचना केली आहे.
शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता पादुकांचे आगमन होणार असून त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठात पाद्यपूजन करण्यात येईल. सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
याचवेळी श्रद्धास्थानातील महाप्रसाद मंडपाचा स्वामी समर्पण सोहळा भारतीय साधू संत आखाड्याचे अध्यक्ष महंत श्री मौनी महाराज (नागपूर) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका मठ, मुंबापुरी गादीचे मठाधीश श्री विजय नलावडे तसेच स्वामीभक्त प्रल्हाद रामचंद्र परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सायंकाळी ७ ते ८ या वेळेत संगीत विशारद सुंदर मेस्त्री यांच्या भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांना दिला जाणार आहे. रात्री ९.३० वाजता स्वामीसुत महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान होईल.
सुमारे १६० वर्षांनी लाभलेल्या या दुर्मीळ आध्यात्मिक योगाचा लाभ घेण्यासाठी स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने गणेश घाडीगावकर यांनी केले आहे.






