मालवण | प्रतिनिधी
डांगमोडे परिसरातील नागरिकांच्या वाहतूक सुविधेचा प्रश्न सोडविण्यासाठी मसुरे–डांगमोडे एसटी बसफेरी तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी डांगमोडे ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सादर करण्यात आलेल्या निवेदनात, डांगमोडे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना नियमित सार्वजनिक वाहतुकीअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः शिक्षण, आरोग्य सेवा, शासकीय कामे आणि बाजारपेठेत जाण्यासाठी एसटी बससेवा अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी अधोरेखित केले.
मसुरे–डांगमोडे मार्गावर नियमित बसफेरी सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांची दळणवळणाची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल, तसेच विद्यार्थी आणि नोकरदारांनाही त्याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ही मागणी तातडीने मान्य करून मसुरे–डांगमोडे बसफेरी सुरू करावी, अशी अपेक्षा डांगमोडे ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केली.






