मालवण | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन आमदार, एक खासदार, पालकमंत्री तसेच ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेसह सर्व प्रमुख सत्तास्थाने महायुतीकडे असतानाही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून ते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला.
मालवण येथील पक्षाच्या शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, राधिका मोंडकर, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.
हरी खोबरेकर म्हणाले की, जिल्ह्यात खासदार, तिन्ही आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे महायुतीचे असतानाही आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची स्थिती आहे. ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषदेवर सत्ता असताना किती प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम आहेत, किती एमबीबीएस डॉक्टर व परिचारिका कार्यरत आहेत, याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्ह्यात एकच आरोग्यसेवक दोन-दोन ठिकाणी काम करत असल्याचा दावा करत त्यांनी ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर असतील तर सुविधा नसतात आणि सुविधा असतील तर डॉक्टर नसतात, अशी परिस्थिती असल्याचे सांगितले. मालवण ग्रामीण रुग्णालयात केवळ सात महिन्यांसाठी तात्पुरत्या डॉक्टरांची नियुक्ती करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात, तर तेथून पुढे गोव्यात उपचारासाठी हलविण्याची वेळ येत असल्याचे सांगत, ही परिस्थिती किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जनतेला विविध घोषणांमध्ये गुंतविण्यापेक्षा आरोग्य क्षेत्रातील मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली.
माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांतून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सिंधुदुर्गसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याचा उल्लेख करत, कुडाळ येथील महिला रुग्णालयातून सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळत होते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सध्याचे सत्ताधारी या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याऐवजी त्या कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद आणि संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात. सर्व सत्तास्थाने हातात असूनही आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचा आरोप करत, आरोग्य व्यवस्थेतील खेळखंडोबा तातडीने थांबवावा, अशी मागणी हरी खोबरेकर यांनी केली.






