रोटरी क्लब मालवण व लिमये हॉस्पिटलचा उपक्रम; १५५ नागरिकांची मोफत तपासणी
मालवण | प्रतिनिधी
रोटरी क्लब मालवण आणि लिमये हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अस्थी खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण १५५ नागरिकांची मोफत बीएमडी तपासणी करण्यात आली.
हाडांच्या ठिसूळपणाचे (ऑस्टिओपोरोसिस) लवकर निदान व्हावे आणि नागरिकांमध्ये हाडांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीनंतर प्रत्येक रुग्णाला त्यांचा बीएमडी अहवाल थेट मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे भविष्यातही हा अहवाल सहजपणे पाहण्याची सुविधा रुग्णांना मिळणार आहे.
शिबिरादरम्यान ज्या रुग्णांच्या तपासणीचे निष्कर्ष सकारात्मक (Positive) आले, त्यांना डॉ. अजित लिमये यांनी आवश्यक औषधोपचार, संतुलित आहार, नियमित व्यायाम तसेच पुढील उपचारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामुळे केवळ तपासणीच नव्हे, तर प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचाही लाभ नागरिकांना मिळाला.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रो. डॉ. लीना लिमये, डॉ. अजित लिमये, प्रदीप सामंत, महादेव पाटकर, अभय कदम, रमाकांत वाक्कर आणि अमरजीत वणकुद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. नीलम जोशी आणि सचिव सौ. प्रविणा शिंदे यांनी शिबिराचे प्रभावी नियोजन व समन्वय सांभाळत उपक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा समाजोपयोगी आरोग्य उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल, असा विश्वास रोटरी क्लब मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.






