सोमवारी स्वीकारला पदभार; सिंधुदुर्गातील विविध ठिकाणी बजावला आहे सेवाकाल
मालवण : प्रतिनिधी
मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अतुल माधवराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या बदलीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.
अतुल जाधव हे मूळ सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील असून २००१ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून नवी मुंबईतील जेएनपीटी येथून त्यांनी पोलीस दलातील कारकिर्दीला सुरुवात केली.
सेवाकाळात त्यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाणे, नवी मुंबई, पनवेल, करंबोली येथे अधिकारी म्हणून काम केले. तसेच जेएनपीटी येथे वाहतूक प्रभारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी वेंगुर्ला आणि वैभववाडी येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून कणकवली पोलीस ठाणे तसेच ओरोस येथील पोलीस नियंत्रण कक्षातही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशानुसार त्यांची मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे मालवण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






