बोगस नोंदणी करणाऱ्या कामगार व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई; तालुका सुविधा केंद्रातच मिळणार ओळखपत्र
मालवण : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक व इतर लाभांचे तब्बल १४ हजार ९०५ प्रलंबित ऑनलाईन अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, हे सर्व अर्ज ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत मंजूर करून मंडळाकडे सादर करण्यात येतील, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी दिली.
दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लाभ अर्जांबाबत तसेच बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सिंधुदुर्ग येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव, दुकाने निरीक्षक रविराज हुंबे तसेच कंत्राटी कनिष्ठ लिपिक सूर्यकांत परब उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्रलंबित अर्जांची माहिती देण्यात आली. त्यानुसार कुडाळ येथे २,४१६, कणकवली ३,७४९, मालवण २,३०८, वेंगुर्ले १,६२३, सावंतवाडी १,७८५, देवगड २,६३४, वैभववाडी ३३४ आणि दोडामार्ग ५६ असे एकूण १४,९०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. हे सर्व अर्ज तातडीने मंजूर करण्याची मागणी महासंघाने केली.
यावर कामगार अधिकारी पंकज खांडेकर यांनी लाभ अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगत ऑक्टोबरअखेर सर्व अर्ज निकाली काढले जातील, असे आश्वासन दिले.
बोगस नोंदणीवर कारवाई
बैठकीत ठेकेदारांच्या खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोंदणी करणाऱ्या बोगस बांधकाम कामगारांबाबतही चर्चा झाली. अशा प्रकरणांतील संबंधित कामगार आणि खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तालुका सुविधा केंद्रातच मिळणार ओळखपत्र
बांधकाम कामगारांना ओळखपत्रासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. आता तालुका स्तरावरील बांधकाम कामगार सुविधा केंद्रांमधूनच ओळखपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, कामगारांनी स्वतः उपस्थित राहून ते स्वीकारावेत, असे आवाहन करण्यात आले.
खऱ्या आणि पात्र बांधकाम कामगारांना मंडळाच्या कोणत्याही लाभापासून वंचित राहू दिले जाणार नाही. सर्व पात्र कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम आणि जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.






