मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुका शासकीय-निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, संचालक प्रमोद लक्ष्मण मोहिते, माजी संचालक के. बी. गांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. परब तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना, पी. जी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला ४४ वर्षे पूर्ण झाली असून, या संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अपार परिश्रमातून उभी राहिलेली संस्था आजही यशस्वीपणे कार्यरत असून, तिचे संस्थापक आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या पी. जी. पाटील यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक प्रमोद लक्ष्मण मोहिते आणि माजी संचालक के. बी. गांवकर यांनीही पी. जी. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या जडणघडणीत त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
सत्काराला उत्तर देताना संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील यांनी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संस्थेच्या प्रगतीबद्दल आणि विद्यमान संचालक मंडळाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत, भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी आपले सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही दिली.






