मालवण (प्रतिनिधी) :
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या संगीत वर्गाचा शुभारंभ ‘संतभार पंढरीत’ या भावभक्तीपर गीतांच्या सुरेल मैफिलीने भक्तिमय वातावरणात झाला. संतवाङ्मय, भक्तिगीते आणि नाट्यसंगीताच्या सुरांनी सजलेल्या या मैफिलीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅ. नाथ पै सेवांगणचे विश्वस्त अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माऊली संगीत विद्यालयाचे प्रमुख संगीत अलंकार प्रफुल रेवंडकर, संपत देसाई, साहित्यिक प्रवीण बांदेकर, सुनील परुळेकर, सदा चुरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. पी. डी. देसाई, लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खंडाळेकर, मंगलताई परुळेकर, डॉ. ज्योती बुवा तोरसकर, नंदू देसाई, नंदू गवंडी, संजय वराडकर, यंदे सर, धामापूरकर सर, खानोलकर सर तसेच सेवांगणचे अनेक पदाधिकारी आणि संगीतप्रेमी उपस्थित होते.
‘संतभार पंढरीत’ या मैफिलीत समता परब यांनी ‘खेळ मांडियेला’, चैतन्या वालावलकर यांनी ‘दत्त दत्त नामाचा महिमा’, तर कुणाल पाटकर यांनी ‘प्रभो विघ्नहर्ता’ आणि ‘सगुण संपन्न पंढरीराया’ ही भक्तिगीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.
मुख्य आकर्षण ठरलेल्या संगीत अलंकार प्रफुल रेवंडकर यांनी ‘आधी रचिली पंढरी’, ‘आली कुठुनसी कानी’, ‘स्वामींच्या दरबारी काय कमी’, ‘मर्मबंधातली ठेव ही’, ‘घेई छंद’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘श्रीरंगा कमलाकांता’ आणि ‘संतभार पंढरीत’ यांसारख्या भक्तिरसपूर्ण गीतांच्या सादरीकरणातून सभागृह अक्षरशः भक्तिमय वातावरणात न्हाऊ घातले. त्यांच्या सुरेल गायनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला हार्मोनियमवर अक्षय सातार्डेकर, तबल्यावर सुधीर गोसावी, गिटारवर देविदास नागोळकर, तर पखवाजवर वैभव मांजरेकर आणि वेदांत गावडे यांनी सुरेल साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व निवेदन विनोद सातार्डेकर यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी नव्याने सुरू होणाऱ्या संगीत वर्गाच्या माध्यमातून मालवणमधील संगीतप्रेमी आणि विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत तसेच गिटार वादनाचे दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, हा संगीत वर्ग येत्या रविवारपासून नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे सुरू होणार असून, इच्छुकांनी नावनोंदणीसाठी संगीत अलंकार प्रफुल रेवंडकर (मो. ९४२०३९७३०५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले.






