तोंडवळी वरची जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम उत्साहात
मालवण (प्रतिनिधी) :
बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी प्रेम, कष्टाची जाणीव आणि आधुनिक शेतीचे ज्ञान निर्माण व्हावे या उद्देशाने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवळी वरची येथे ‘बळीराजासाठी एक दिवस’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला गावच्या सरपंच स्नेहा तोंडवळकर, हडी व कोळंब केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मानसी चव्हाण व अनन्या पाटील, ग्रामस्थ बबली पाटील, मुख्याध्यापिका स्मिता परब, सहशिक्षिका सोनल कदम व विभा ठाकूर यांच्यासह पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकरी सुधीर पाटील आणि देवानंद पाटील यांच्या शेताला भेट देत शेतीतील विविध कामांची प्रत्यक्ष माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन शेतीतील आव्हाने, पिकांचे संरक्षण, आधुनिक व पारंपरिक शेतीपद्धती तसेच विविध शेती अवजारांची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतात प्रत्यक्ष काम करून शेतीतील कष्टाचा अनुभवही घेतला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “गुडघा गुडघा चिखलात चिखलात” या गीतावर सादरीकरण करून उपस्थित शेतकरी बांधवांचे मनोरंजन केले. त्यानंतर शेताच्या बांधावर सर्वांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेत ग्रामीण जीवनाशी जवळीक साधली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, शेतकऱ्यांच्या कष्टांविषयी संवेदनशीलता आणि बळीराजाप्रती कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी सुधीर पाटील आणि देवानंद पाटील यांचे आभार मानून उपक्रमाची सांगता करण्यात आली.






