मालवण (प्रतिनिधी) :
आचरा येथील श्री रामेश्वर वाचन मंदिराच्या वतीने दिला जाणारा ॲड. सायली मारुती आचरेकर पुरस्कृत, श्री. मारुती प्रभाकर आचरेकर स्मरणार्थ सन २०२६ चा ‘चोखंदळ महिला वाचक पुरस्कार’ आचरा वरचीवाडी येथील श्रीमती निशा यशवंत पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला.
संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, पुरस्काराच्या पुरस्कर्त्या श्रीमती मृणालिनी मारुती आचरेकर, अथर्व मारुती आचरेकर तसेच जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी वाचनालयाचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, वैशाली सांबारी, दीपाली कावले, विरेंद्र पुजारे, साहित्यिक सुरेश ठाकूर, सुरेंद्र सकपाळ, ग्रंथपाल विजया मयेकर, सहायक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण आदी उपस्थित होते.
श्रीमती निशा पटवर्धन यांना धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्याची विशेष आवड असून ज्येष्ठ नागरिकांची सेवा तसेच प्राणीमात्रांविषयीची जिव्हाळ्याची भावना हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्या नियमितपणे वाचनालयात येऊन धार्मिक पुस्तकांसह वैचारिक आणि चरित्रात्मक साहित्याचेही मनोयोगाने वाचन करतात. वाचलेल्या पुस्तकांवरील विचार ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांशी संवादातून मांडण्याची त्यांची सवय असून, घरातील जबाबदाऱ्या सांभाळत सातत्याने वाचनाची जोपासना केल्याबद्दल त्यांची यंदाच्या ‘चोखंदळ महिला वाचक पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.






