मालवण | प्रतिनिधी
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मालवण आगारातून मालवण-अक्कलकोट थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या सेवेमुळे कोकणातील प्रवाशांना कोणतीही बस बदलण्याची आवश्यकता नसून थेट अक्कलकोटपर्यंत प्रवास करता येणार आहे.
या बसचे दररोज दुपारी ३.४५ वाजता मालवण आगारातून प्रस्थान होणार असून, अक्कलकोट येथून सायंकाळी ७.३० वाजता परतीचा प्रवास सुरू होईल. या मार्गावर आचरा, कणकवली, तळेरे, वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापूर, सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर या प्रमुख स्थानकांवरून बस धावणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या बससेवेसाठी ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विविध प्रवासी सवलत योजनांनुसार महिलांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के प्रवास सवलत लागू राहणार आहे.
या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण आगाराने केले आहे. अधिक माहितीसाठी मालवण आगार – ०२३६५-२५२०३४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.






