मालवण | प्रतिनिधी
“मानवी जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरू हा केवळ शिक्षण देणारा नसून शिष्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारा दीपस्तंभ असतो. विद्यार्थी मिरवणारे, गिरवणारे आणि घडविणारे असे तीन प्रकारचे असतात. विद्यार्थ्यांनी स्वतः घडतानाच इतरांनाही घडविण्याचा प्रयत्न करावा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विनय, विवेकबुद्धी आणि योग्य दिशेने वाटचाल आवश्यक आहे,” असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांनी केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कैलास राबते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासमुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, शिक्षक संदीप अवसरे, शिक्षिका संजना सारंग, अस्मिता वाईरकर, सरोज बांदेकर, पालक महेश परब, मानसी परब, अमित मयेकर तसेच ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
प्राचार्य राबते यांनी आपल्या मार्गदर्शनात गुरूचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना, प्रत्येक गुरूची इच्छा आपल्या शिष्याने प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचावी हीच असते, असे सांगितले. शिक्षकांनी दाखविलेल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विषद करणारी समयोचित भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय परब यांनी केले, तर कु. उर्विका मालंडकर हिने आभार प्रदर्शन केले.






