मालवण | प्रतिनिधी
महाविद्यालयीन वयातच युवतींनी आपल्या आरोग्याची आणि भविष्याची काळजी घेणे आवश्यक असून, मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच सशक्त समाजाची निर्मिती करू शकते, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव साबाजी गावडे यांनी केले.
डॉ. दादासाहेब वराडकर कला, वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय कट्टा-पेंडूर आणि महाविद्यालय विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुली व महाविद्यालयीन युवतींसाठी आयोजित महिला आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन आनंद वराडकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. जाई पोळ, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, उपप्राचार्य रवींद्र गावडे आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
आरोग्य शिबिरात जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. बालन, जिल्हा दंतचिकित्सक डॉ. चाटे, ग्रामीण रुग्णालय कट्टा-पेंडूरचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संस्थेच्या तिन्ही विभागांतील किशोरवयीन मुली, महाविद्यालयीन युवती, महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांसह एकूण २१९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उपस्थितांना व्यसनमुक्त राहण्याची शपथही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या सहाय्यक प्रा. श्रुती कुंभार यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. पौर्णिमा मसुरकर यांनी केले.






