मालवण | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था व भाषा संचालनालयाच्या आर्थिक सहकार्याने तसेच बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने येत्या २८ व २९ नोव्हेंबर रोजी मालवण येथे सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनाची संकल्पना ‘युवा संमेलन : माझा काळ, माझी भूमिका’ अशी असून, साहित्य, समाजकारण आणि समकालीन प्रश्नांवर युवा पिढीला विचारमंथनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या संमेलनातून करण्यात येणार आहे.
बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत साहित्यिक प्रवीण बांदेकर व सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी ही माहिती दिली. यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खांडाळेकर, डॉ. ज्योती तोरसकर, ॲड. संदीप निंबाळकर, सौ. साटलकर, ॲड. पी. डी. देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पुण्यातील प्रसिद्ध युवा कादंबरीकार व वैचारिक लेखक श्रीरंजन आवटे उपस्थित राहणार आहेत. तर कोल्हापूरच्या गायिका आणि संत साहित्याच्या अभ्यासक रुचिका खोत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून ॲड. देवदत्त परुळेकर जबाबदारी सांभाळणार आहेत.
२८ नोव्हेंबर रोजी भव्य ग्रंथदिंडी व शोभायात्रेने संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर स्थानिक कवींचे कवीसंमेलन आणि रुचिका खोत यांचा ‘किर्तावणी’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.
२९ नोव्हेंबर रोजी उद्घाटन सत्रानंतर सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेले मानसोपचार तज्ज्ञ व साहित्यिक डॉ. रूपेश पाटकर यांची प्रकट मुलाखत डॉ. ज्योती तोरसकर आणि पराग गावकर घेणार आहेत. दुपारच्या सत्रात ‘माझे लेखन आणि आजचे वर्तमान’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, राज्य पुरस्कारप्राप्त विचारवंत ज्ञानेश्वर बंडगर, युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे, बीबीसी मराठीचे पत्रकार विनायक होगाडे आणि सरिता पवार सहभागी होणार आहेत. सायंकाळी जिल्ह्यातील निवडक युवा कवींचे कवीसंमेलन होऊन संमेलनाचा समारोप होईल.
गेल्या वर्षी सावंतवाडी येथे झालेल्या जिल्हा साहित्य संमेलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदाचे संमेलन तरुण पिढीच्या साहित्यिक अभिव्यक्तीला चालना देणारे आणि वर्तमान सामाजिक-राजकीय घडामोडींवर विधायक मंथन घडवून आणणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि युवा वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.






