मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; किनारपट्टीवर दिवसरात्र देखरेख
मालवण : प्रतिनिधी
समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘पोर्टा केबिन’ मालवण येथे उभारण्यात आले आहे. मालवण बंदर जेटी येथे उभारण्यात आलेल्या या पोर्टा केबिनचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील महत्त्वाच्या समुद्रकिनारी भागात आणि लँडिंग पॉईंटवर किनारी सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या पोर्टा केबिनची उभारणी करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोटींची मोठ्या प्रमाणात होणारी ये-जा, वाढती पर्यटकांची संख्या आणि किनारपट्टीचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील १४ लँडिंग पॉईंटवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांच्या निधीतून जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून ही पोर्टा केबिन उभारण्यात आली आहेत.
मालवणसह तारकर्ली आणि सर्जेकोट येथेही पोर्टा केबिन उभारण्यात आले असून, या केंद्रांमधून किनारी भागावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा परिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक विकी तोरसकर, देवानंद लोकेगांवकर, किसन मांजरेकर, पंकज सादये, सुरेश बापार्डेकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण किनारपट्टीवर या पोर्टा केबिनच्या माध्यमातून दिवसरात्र गस्त आणि देखरेख ठेवण्यात येणार आहे. समुद्रातून येणाऱ्या-जाणाऱ्या बोटी, किनाऱ्यावर आढळणाऱ्या संशयास्पद वस्तू, व्यक्ती किंवा हालचालींवर लक्ष ठेवून तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात येणार आहे.
किनारी सुरक्षेसाठी पोलिसांसोबत प्रशिक्षित मरीन होमगार्ड तसेच मत्स्य विभागाचे वार्डनही कार्यरत राहणार आहेत. समुद्र आणि किनारपट्टीची माहिती असलेल्या या यंत्रणांच्या मदतीने संशयास्पद हालचालींवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
मालवण हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किनारपट्टी भाग आहे. येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी तसेच मच्छीमारी आणि पर्यटन व्यवसायातील बोटींची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे किनारी सुरक्षा, आपत्कालीन परिस्थितीतील तातडीची कार्यवाही आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पोर्टा केबिन महत्त्वाचा सुरक्षा दुवा ठरणार आहे.






