रूपेश टेमकर आणि सहकाऱ्यांनी ग्रामपंचायत व पोलिसांचे वेधले लक्ष
मालवण : प्रतिनिधी
आचरा गावातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद असलेली ही सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत आचरा ग्रामपंचायत आणि आचरा पोलिस ठाण्याला निवेदन देऊन सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असताना ती बंद असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वीज बिल न भरल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब खरी असल्यास यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वीही या समस्येबाबत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
निवेदनाद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असण्याचे नेमके कारण काय आहे, यासाठी जबाबदार कोण आहे, कॅमेरे कोणत्या तारखेपर्यंत सुरू केले जाणार आहेत तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याची लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत गावातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू न झाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनाची वेळ, ठिकाण आणि स्वरूप याची माहिती पुढील काळात जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
हे निवेदन आचरा ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले यांना देण्यात आले.
यावेळी रूपेश टेमकर, अनिकेत पांगे, शैलेश सारंग, निलेश घाडी, प्रज्ञेश आचरेकर, गणेश पाटकर, दर्पण आचरेकर, चिन्मय वस्त, रोहित भिरंवडेकर, गौरव पेडणेकर, राकेश यादव, प्रथमेश कांबळी, बंडू पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.






