मालवण | प्रतिनिधी
मालवणच्या किनारपट्टीवर पर्यटनासाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करून स्थानिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर राज्य सरकार भर देत असल्याची ग्वाही राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून मालवण बंदर जेटी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी पात्र ठरलेल्या ३५ नव्या होडी व्यवसायिकांना उद्देशपत्रांचे (Letter of Intent) वितरण करण्यात आले.
मालवण येथील दैवज्ञ भवनात झालेल्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्देशपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मेरीटाईम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, जि. प. बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, पर्यटन व होडी व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली असून आता राजकोट किल्ल्यामुळेही पर्यटनाला चालना मिळत आहे. दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मालवणला भेट देत असून भविष्यात ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील पर्यटन सुविधा, जलवाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकार विशेष भर देत आहे.
स्थानिक स्टॉलधारकांना कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची नवी शॉप पॉलिसी लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत बंदरे व मत्स्यव्यवसाय विभागात लवकरच ४५० पदांची भरती केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मच्छीमारांच्या हितासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या योजनेतून कर्जमाफी मिळवून देणे आणि सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार निलेश राणे विकासासंदर्भात जे प्रश्न मांडतील, त्यांना न्याय देण्याचे काम सरकार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सिंधुरत्न योजनेतून दैवज्ञ भवनाच्या दुरुस्ती व सुधारणेची कामे हाती घेतली जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी ३५ नव्या परवानग्या मिळाल्याने स्थानिक युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मालवणच्या किनारपट्टीचे सुशोभीकरण, मेरीटाईम बोर्डाच्या सुविधांचा विस्तार, मच्छीमारांना राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या कर्जातून वगळणे आणि सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देणे या मागण्या त्यांनी मांडल्या. मत्स्यव्यवसाय खात्याला कृषीचा दर्जा मिळवून देण्यात नितेश राणे यांचे मोठे योगदान असून मच्छीमारांचे उर्वरित प्रश्नही त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






