विद्यार्थ्यांनी केले शिक्षकांचे पूजन; गुरुंच्या महत्त्वावर मार्गदर्शन
मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदांचे पूजन करून त्यांना गुलाब पुष्प अर्पण केले व आशीर्वाद घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीदेवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज तसेच महर्षी व्यासमुनी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. बनसोडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्राचार्य आर. डी. बनसोडे यांनी आपल्या मनोगतातून गुरुपरंपरेचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुरुंचे स्थान याबाबत मार्गदर्शन केले. गुरु हे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात, असे त्यांनी सांगितले.
प्रा. बांदेकर यांनी विद्यार्थ्यांनी गुरूंसोबत आयुष्यभर नम्रतेने वर्तन करावे आणि गुरुंचा कायम आदर राखावा, असे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिव्या गोलतकर, गौरी गराटे आणि शौर्य कांबळी यांनी गुरुंचे महत्त्व तसेच त्यांच्याप्रती असलेला आदर आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आकर्षक रांगोळी, फलक लेखन आणि सजावट केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी संचिता हिने केले, तर विद्यार्थी दर्शित कांबळी याने उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






