मालवण, प्रतिनिधी :
मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरुजनांना पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाला भावपूर्ण स्वरूप दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांचे स्वागत प्रा. खान यांनी केले. विद्यार्थिनी पल्लवी सामंत हिने प्रास्ताविक केले. यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापकांना गुलाबपुष्प अर्पण करून गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त केला.
यावेळी प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रा. खान, प्रा. स्नेहा बर्वे आणि प्रा. मिलन सामंत यांनी गुरुपौर्णिमेचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थी जीवन नाईक, प्रज्ञा पवार, प्राची वेंगुर्लेकर आणि नमिता कदम यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षिता गावकर हिने केले, तर आभार खुशी सावंत हिने मानले. कार्यक्रमासाठी आकर्षक फलकलेखन धनश्री गावडे आणि सृष्टी कदम यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






