मालवण, प्रतिनिधी :
दुर्गवीर प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने ऐतिहासिक रामगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील देवडीजवळ अनेक वर्षांपासून साचलेला मातीचा थर हटविण्यात आला. यामुळे मातीत गाडली गेलेली ऐतिहासिक दगडी पायरी पुन्हा प्रकाशात आली असून, गडाच्या संवर्धनाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण उपलब्धी मानली जात आहे.
श्रमदानादरम्यान गडावरील कालांतराने विस्कळीत झालेल्या दगडी पायऱ्यांची पुनर्बांधणी करून त्या पूर्ववत करण्यात आल्या. प्रत्येक दगड मूळ जागी बसवत गडाचे ऐतिहासिक स्वरूप जपण्याचा प्रयत्न दुर्गवीरांनी केला.
काम सुरू करण्यापूर्वी माती हटवल्यानंतर त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, उत्खननादरम्यान इतिहासकालीन जलनिचरा व्यवस्था (ड्रेनेज) उघडकीस आली. शेकडो वर्षांपूर्वी उभारलेली ही जलनियोजन व्यवस्था आजही कार्यक्षम असल्याचे दिसून आल्याने गडावरील स्थापत्यशास्त्राची प्रगल्भता अधोरेखित झाली. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होणार असल्याची खात्री मिळाल्याने संवर्धनाचे काम अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आले.
दुर्गवीर प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे रामगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सातत्याने श्रमदान करत असून, गडाचे मूळ ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या मोहिमेदरम्यान अनेक वर्षांपासून मनात असलेले एक महत्त्वाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना दुर्गवीरांनी व्यक्त केली. श्रमाचे प्रत्येक थेंब इतिहास संवर्धनाच्या समाधानात परिवर्तित झाल्याचेही त्यांनी सांगितले.
या श्रमदान मोहिमेत मधुकर विचारे, लक्ष्मण घाडीगावकर, तुषार चव्हाण, मिलिंद चव्हाण, सुबोध चव्हाण, ओंकार पालव, प्रथमेश राणे, प्रणय चव्हाण आणि हार्दिक परब यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भविष्यातही रामगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी अशाच प्रकारे सातत्याने श्रमदान सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






