मालवण, प्रतिनिधी :
आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या वस्त्रसंकलन उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामस्थांकडून संकलित करण्यात आलेले वापरण्यायोग्य कपडे गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आनंद संस्था संचालित सविता आश्रम, पणदूर येथे भेट देत आश्रमाला दान करण्यात आले.
यावेळी आश्रमाचे संस्थापक-अध्यक्ष संदीप परब यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती देत श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्टचे आभार मानले. तसेच भविष्यात ट्रस्ट आणि पळसंब गावासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष मेघश्याम गोलतकर, सचिव मधुकर कदम, पळसंबचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, पोलीस पाटील अनुष्का परब, जयंतीदेवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, सत्यवान सावंत, दिपेश घाडी, पुरुषोत्तम साईल, प्रथमेश परब, भुवन परब, अविराज परब, देऊ सावंत आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ट्रस्टतर्फे भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.






