मालवण, प्रतिनिधी :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत मालवण तालुक्यात धडक कारवाई करत विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली १ लाख ८३ हजार १४५ रुपये किमतीची महाराष्ट्र बनावटीची दारू आणि बिअर जप्त केली. याप्रकरणी सीमा संदीप जगताप (वय ४८, रा. कुमामे, गुरामवाडी, ता. मालवण) यांच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि. २८ जुलै) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कुमामे येथील गुरामवाडी परिसरात छापा टाकला. यावेळी संशयिताच्या राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली महाराष्ट्र बनावटीची दारू आणि बिअरचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ हा साठा जप्त करून संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८३ हजार १४५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सनील पाटील, हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोजा, आशिष जामदार आणि स्वाती सावंत यांनी सहभाग घेतला. पुढील तपास मालवण पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.






